श्रीनगर - जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांची क्रिकेटपटू सुरेश रैनाने शुक्रवारी भेट घेतली. राज्यातील खेळ विशेषत: क्रिकेटला चालना देण्यासाठी रैनाने ही भेट घेतली. रैनाने जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह आणि अनंतनागचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक संदीप सिंग यांना खोऱ्यातील क्रीडाउपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी पत्र लिहिले होते. १५ ऑगस्टला रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
"मी १५ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये माझा ठसा उमटवला आहे. म्हणूनच मला माझा अनुभव पुढील पिढीला द्यायचा आहे. या भागातील विविध शाळा आणि महाविद्यालयांतील प्रतिभावान तरुण खेळाडू शोधण्याचा माझा मानस आहे. क्रिकेट हा केवळ एक खेळ नाही, तर ही अशी प्रक्रिया आहे जी व्यावसायिक वृत्ती, शिस्त आणि तंदुरुस्त राहण्यासाठी मदत करते आणि आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवून त्यांच्यात सुधारणा करते", असे मूळचा श्रीनगरचा असलेल्या रैनाने पत्रात म्हटले होते.
रैनाने मनोज सिन्हा यांची भेट घेतल्यानंतर त्याने जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांची भेट घेतली. या बैठकीसंदर्भात रैनाने ट्विटरवर लिहिले, ''माननीय लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांचे सहकार्य मिळाल्यामुळे मला फार आनंद झाला. जम्मू-काश्मीरमध्ये खेळाचे व्यासपीठ तयार करण्याच्या दिशेने काम करण्यासाठी आज त्यांच्यासमवेत एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली गेली होती. चला या कार्याला पुढे नेऊ.''
रैना आणि दिलबाग सिंग यांच्यात झालेल्या बैठकीबद्दल वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणाले, ''क्रिकेटपटू सुरेश रैना आणि डीजीपी दिलबाग सिंग यांच्यात युवकांच्या कौशल्य विकासाबाबत आणि खेळाच्या प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा झाली.''
सुरेश रैनाने २००५ साली श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर पाच वर्षानंतर त्याने श्रीलंकेविरुद्धच पहिला कसोटी सामना खेळला. या सामन्यात त्याने शतक नोंदवले. रैना २०११च्या आणि २०१५च्या विश्चचषक टीममध्येही सहभागी होता. २०१३ची चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धाही तो खेळला आहे.
रैना १८ कसोटी सामने खेळला असून त्यामध्ये त्याने ३१ इनिंगमध्ये ७६८ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये दमदार सुरुवात करूनही रैना फक्त १८ कसोटी सामने खेळला. २६.४८च्या सरासरीने त्याने धावा केल्या. यात १ शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. २२६ एकदिवसीय सामन्यात सुरेश रैनाने ५ हजार ६१५ धावा केल्या. तर ७८ टी-२० सामन्यात त्याने १ हजार ६०५ धावा केल्या आहेत.