आणंद (गुजरात) - आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आज बुधवारी विवाहबंधनात अडकला आहे. जयदेव आणि रीनी यांनी आणंद येथील मधुबन रिसॉर्टमध्ये 'गुपचूप' पद्धतीने आपली लग्नगाठ बांधली.
जयदेव आणि रीनी यांच्या कुटुंबातील काही सदस्य आणि त्यांचे काही मित्र लग्नाला उपस्थित होते. हा समारंभ खासगी पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान सोशल मीडियासाठी कोणत्याही प्रकारचे फोटो किंवा व्हिडिओ घेऊ नयेत, याची काळजी घेतली गेली.
हेही वाचा - आनंदाची बातमी...टेनिसचा राजा करणार 'कमबॅक'
सौराष्ट्र संघातील काही खेळाडूही जयदेव-रीनी यांच्या लग्नाला उपस्थित होते. १५ मार्च २०२० रोजी जयदेवने रीनीशी साखरपुडा केला होता. आज जवळपास वर्षभरानंतर दोघेही लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जयदेवची पत्नी रीनी व्यवसायाने वकील आहेत.
२०१८च्या आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने जयदेव उनाडकटवर ११.५ कोटींची बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतले होते. २०१८च्या लिलावात तो सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. यावर्षीही राजस्थान रॉयल्सने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला संघात कायम ठेवले आहे.
जयदेव उनाडकटने भारतासाठी १ कसोटी, ७ एकदिवसीय आणि १० टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने ८ एकदिवसीय आणि १४ टी-२० बळी घेतले आहे.