केपटाउन - कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे खबरदारीचा उपाय म्हणून क्रिकेट दक्षिण आफ्रिका बोर्डाने पुढील ६० दिवसांसाठी म्हणजे, दोन महिन्यांसाठी सर्व क्रिकेटच्या स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला महामारी घोषित करत जगात आरोग्य आणीबाणीची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचे ६४ रुग्ण आढळले आहेत.
दक्षिण आफ्रिका बोर्डाने सांगितले की, 'राष्ट्रपती रामाफोसा यांनी आफ्रिकन जनतेला केलेल्या आवाहनानंतर बोर्डाची एक बैठक झाली. या बैठकीत कोरोनामुळे पुढील ६० दिवस कोणतेही क्रिकेटचे सामने होणार नाहीत, असे ठरवण्यात आले. यात प्रथम श्रेणी, लिस्ट ए, सेमी प्रोफेशनल किंवा प्रोविंशनल क्रिकेटचाही समावेश आहे.'
दक्षिण आफ्रिकेचा संघ ३ सामन्याची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. धर्मशाळा येथील पहिला सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकताच रद्द करण्यात आला. त्यानंतर कोरोनाच्या धोक्यामुळे राहिलेले दोन सामने विनाप्रेक्षक खेळवण्यात येतील, असे सांगण्यात आले. मात्र, कोरोनाचा वाढलेला प्रभाव पाहता, बीसीसीआयने उर्वरित मालिका रद्द करण्यात आल्याची घोषणा केली.
आफ्रिकेचा संघ अद्याप भारतातच आहे. आज आफ्रिकन संघ लखनऊमधून कोलकातामध्ये दाखल झाला असून तो उद्या (ता. १७) कोलकाता-दुबईमार्गे मायदेशी परतणार आहे.
दरम्यान, जगभरात कोरोनाचा फैलाव वाऱ्यासारखा होत आहे. या विषाणूने १०० हून अधिक देश ग्रासले आहेत. तर ६ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
हेही वाचा - VIDEO : शोएब म्हणतो.. भारताला युद्ध नकोय; भारताची भरभराटी व्हायला हवी
हेही वाचा - VIDEO : PSL लीगमध्ये नजीर-आफ्रिदीत रंगली टशन, पाहा काय झालं ते...