सिडनी - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, अशा काळात ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटची एक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, ना नाणेफेक झाली ना सामना झाला, पण स्पर्धेचा विजेता मात्र घोषित करण्यात आला.
ऑस्ट्रेलियामध्ये नुकतीच शेफिल्ड शील्ड ही क्रिकेटची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचा अंतिम सामना कोरोनाच्या धोक्यामुळे रद्द करण्यात आला आणि गुणातालिकेनुसार या स्पर्धेचा विजेता घोषित करण्यात आला. गुणातालिकेत न्यू साउथ वेल्स अव्वलस्थानी असल्याने त्याला विजेता ठरवण्यात आले.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी केविन रॉबर्टर्स यांनी सांगितलं, की शेफिल्ड शील्ड स्पर्धेचा अंतिम सामना २७ मार्चला होणार होता. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तो सामना होणं शक्य नाही. गुणातालिकेत न्यू साउथ वेल्स अव्वलस्थानी असल्याने, त्यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.
दरम्यान, कोरोनाच्या धोक्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपले मेलबर्नमधील मुख्यालय बंद केले असून त्यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत.
चीनमधून जगभरात प्रसार झालेल्या कोरोना विषाणूमुळे ६ हजाराहून अधिक लोकांना आपला प्राण गमवाला लागला आहे. तर दीड लाखांहून अधिक लोकांना विषाणूची बाधा झाली आहे. ऑस्ट्रेलियात कोरोनाचे ४०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर या विषाणूने ऑस्ट्रेलियात ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - क्रीडा क्षेत्रात कोरोनाचा पहिला बळी, २१ वर्षीय फुटबॉल प्रशिक्षकाचा मृत्यू
हेही वाचा - टी-२० विश्वकरंडकावर कोरोनाचे सावट? यजमान ऑस्ट्रेलियाने दिले 'हे' अपडेट