जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डातील ७ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. क्रिकेट बोर्डाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करुन घेतली होती. या चाचणीत ७ जण पॉझिटिव्ह आढळून आले. ही माहिती दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक फॉल यांनी दिली.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मार्च महिन्यामध्ये भारताचा दौरा केला होता. ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी आलेल्या, आफ्रिकी संघाला कोरोनाच्या वाढलेल्या संसर्गामुळे ही मालिका न खेळताच मायदेशी परतावे लागले. भारतातून मायदेशी परतल्यानंतर सर्व खेळाडूंना क्वारंटाइन करण्यात आले होते. यानंतर आता क्रिकेट बोर्डाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करुन घेतली होती. यात अधिकाऱ्यांपासून, प्रशिक्षक व खेळाडूंचाही समावेश होता. शंभरपेक्षा जास्त सदस्यांची चाचणी केल्यानंतर आलेल्या अहवालात ७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
याविषयी दक्षिण आफ्रिकी क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक फॉल यांनी सांगितले की, 'येत्या काळात आम्ही आणखी सदस्यांची चाचणी करणार आहोत. शंभरपेक्षा जास्त सदस्यांची चाचणी केल्यानंतर ७ जणांना कोरोनाची लागण होणे हा आकडा खरंतर नगण्य आहे, पण तरीही आम्ही सर्व ती काळजी घेणार आहोत.'
पॉझिटिव्ह आढळलेल्या ७ अहवालांमध्ये खेळाडूचा समावेश आहे का? हे सांगायला फॉल यांनी नकार दिला. नियमाप्रमाणे पॉझिटिव्ह रुग्णाची माहिती सांगण्याची परवानगी नसल्याचे फॉल म्हणाले. दरम्यान, इंग्लंड दौऱ्यासाठी निघालेल्या पाकिस्तान संघातील ३ खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हैदर अली, हारिस रौफ आणि शादाब खान अशी लागण झालेल्या खेळाडूंची नावे आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली.
हेही वाचा - ''राहुल द्रविडला कर्णधारपदाचे अपेक्षित श्रेय मिळाले नाही''
हेही वाचा - पाकिस्तानला धक्का...! इंग्लंड दौऱ्याआधी 'या' 3 खेळाडूंना कोरोनाची लागण