सेंट लुसिया - विंडीजचा खतरनाक खेळाडू ख्रिस गेलने २०१९ च्या विश्वचषकानंतर निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे. तेव्हापासून तो अधिकच आक्रमक खेळताना दिसून येत आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने ३९ षटकार ठोकत नवा विक्रम केला होता. सध्या तो इंग्लंडविरुद्ध टी-२० सामना खेळत आहे. पहिल्याच सामन्यात त्याने आणखी एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
५ मार्च रोजी झालेल्या पहिल्याच सामन्यात २ षटकाराच्या सहाय्याने त्याने १५ धावा केल्या. याचसोबत त्याने नवा विक्रम केला आहे. गेल टी-२० क्रिकेटमध्ये विंडीजकडून सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू बनला आहे. त्याने मार्लन सॅम्युअल्सचा १६११ धावांचा विक्रम मोडीत काढला आहे. गेलने टी-२० क्रिकेटमध्ये १६२२ धावा केल्या आहेत.
गेलने ५७ टी-२० सामन्यात ५३ डाव खेळून ३३.१ च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. त्यात २ शतके आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. ११७ ही त्याची सर्वाधिक वैयक्तिक खेळी आहे. इंग्लंडने पहिल्या टी-२० सामन्यात ४ गडी राखून विजय मिळविला होता. विंडीजने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १६० धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात इंग्लंडने ४ गडी राखून हे आव्हान पार केले. दोन्ही संघात ९ मार्च रोजी दुसरा सामना खेळला जाणार आहे.