नवी दिल्ली - विंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेले माजी कर्णधार रामनरेश सारवान प्रकरणात माफी मागितली आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमधील जमैका तालावाझने गेलला संघात कायम राखलेले नाही. याला सारवान कारणीभूत असल्याचे गेलने म्हटले होते. गेलने माफी मागितली असली तरी तो आपल्या विधानावर कायम राहणार असल्याचे त्याने सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडीज संघाचे दोन माजी कर्णधार ख्रिस गेल आणि रामनरेश सारवान यांच्यात काही आलबेल नसल्याचे समोर आले. गेलने सारवानला साप म्हटले. इतकेच नव्हे तर, सारवान कोरोना व्हायरसपेक्षाही वाईट असल्याचे गेलने सांगितले होते.
गेल म्हणाला, “मी माझे वक्तव्य फक्त एका उद्देशाने केले होते. मी दुसऱ्यांदा फ्रेंचायझीमधून का वेगळा झालो, हे मी जमैकाच्या चाहत्यांना सांगितले. जमैकाकडून खेळताना निरोप घेण्याची माझी सर्वात मोठी इच्छा होती. मला माझ्या घरच्या मैदानावर सबिना पार्कवर प्रेक्षकांसमोर शेवटचा सामना खेळायचा होता. मी या फ्रेंचायझीसाठी सीपीएलची दोन विजेतेपदे जिंकली आहेत.”
गेल पुढे म्हणाला, “जोपर्यंत माझ्या नाराजीचा प्रश्न आहे, तोपर्यंत मी माझ्या विधानावर ठाम आहे. मी जे काही बोललो ते मनापासून होते.” तथापि, गेलने कबूल केले की अशा विधानांमुळे क्रिकेट वेस्ट इंडीज (सीडब्ल्यू) आणि सीपीएलच्या ब्रँडचीही प्रतिमा खराब होऊ शकते. गेल म्हणाला, “या टी -२० स्पर्धेला नुकसान पोहचवणे माझे उद्दीष्ट नव्हते. सीपीएलने गेल्या सात वर्षांपासून माझ्या कॅरेबियन चाहत्यांसमोर क्रिकेट खेळण्याची मला संधी दिली आहे. हा माझा मोठा सन्मान आहे.’’
सीपीएल समितीने निर्णय घेतला आहे की गेलच्या विरोधात सादर झालेल्या खटल्यात कोणत्याही प्रकारच्या न्यायाधिकरणाचा सल्ला घेतला जाणार नाही. गेलने सर्वांशी चांगले संबंध असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे समितीने गेलशी संबंधित प्रकरणही बंद केले आहे.