मुंबई - भारतीय संघातील बहुतांश खेळाडू यूएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेमध्ये खेळत आहेत. या स्पर्धेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी यूएईमधूनच रवाना होणार आहे. दरम्यान, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी हे कसोटी स्पेशालिस्ट आयपीएलमध्ये खेळत नाहीत. त्यामुळे त्या दोघांसह इतर सपोर्ट स्टाफ यूएईला रवाना होणार असून आयपीएल संपल्यानंतर भारताचा संपूर्ण संघ एकत्रितपणे यूएईतून ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर जाणार आहे.
कोण-कोण जाणार युएईला -
चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी यांच्यासह फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण व क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर हे युएईला जाणार आहेत. ते पुढील रविवारी यूएईकडे प्रयाण करतील. दरम्यान, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आज (सोमवारी) यूएईला रवाना होण्याची शक्यता आहे.
आगामी दिवसांमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी होणार संघ निवड -
भारतीय संघ आयपीएलनंतर ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. पण अद्याप बीसीसीआयकडून संघाची निवड करण्यात आलेली नाही. यावर सूत्रांकडून सांगण्यात आले की, क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकावर बीसीसीआयकडून अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. त्यामुळे संघ निवडीला विलंब होत आहे. पण आगामी दिवसांमध्ये ही निवड केली जाईल.
चेतेश्वर पुजारासह सर्वांना व्हावे लागणार क्वारंटाइन -
चेतेश्वर पुजारा व हनुमा विहारी यांच्यासह सपोर्ट स्टाफला यूएईमध्ये पोहोचल्यानंतर सहा दिवस क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. तसेच त्यांची सातत्याने कोरोना चाचणीही करण्यात येणार आहे. पण त्यांना आयपीएल बायो बबलमध्ये ठेवण्यात येणार नाही. त्यांच्यासाठी वेगळ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
हेही वाचा - आयपीएलच्या प्ले ऑफ फेरीचे वेळापत्रक जाहीर; दुबईत रंगणार अंतिम सामना
हेही वाचा - MI vs RR : शतकानंतर बेन स्टोक्सचे मधलं बोट दाखवत सेलिब्रेशन, जाणून घ्या कारण...