नवी दिल्ली - आयसीसीच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. विश्वचषकाचा थरार सुरू होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले असताना भारतीय क्रिकेट निवड समिती प्रमुख एम. एस. के प्रसाद यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
प्रसाद यांनी एका पत्रकार परिषदेत माहीती देताना सांगितले, की २० एप्रिलपूर्वी विश्वचषकासाठीचा भारतीय संघ जाहीर करण्यात येईल. तसेच त्यांनी भारतीय संघ २०१९ विश्वचषक स्पर्धेचा प्रबळ दावेदार असल्याचेही म्हटले आहे.
विश्वचषकाची सुरुवात ३० मेला यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यापासून होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना १४ जुलैला लॉर्डसच्या ऐतिहासिक मैदानावर होणार आहे. आतापर्यंत अनेक दिग्गजांनी भारत आणि यजमान इंग्लंड या २ संघाना विजेतेपदासाठी सर्वाधिक पसंती दिली आहे.