लंडन - आयसीसीच्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेला आता काहीच दिवस बाकी राहिले असून इंग्लंडमध्ये ३० मेपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आयसीसीने विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांच्या कर्णधारांची एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
या पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार विराट कोहलीला विरोधी संघातील खेळाडूंपैकी कोणता खेळाडू भारतीय संघात घ्यावासा वाटेल, असा काल्पनिक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना विराट म्हणाला की, 'दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसला मला भारतीय संघात पाहायला आवडेल. तर फाफ डु प्लेसिसने विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकन संघात हवा होता असे म्हटले आहे.
योगायोग म्हणजे या विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा पहिला सामना हा 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच होणार असून फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली आपल्या पहिल्या विजयासाठी आमने-सामने येणार आहेत. 30 मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेटचा महाकुंभ समजला जाणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेची सुरुवात होणार आहे.