साऊथम्प्टन - बुधवारपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड आणि विंडीज यांच्यातील कसोटी मालिकेवर वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने भाष्य केले आहे. एजेस बाउलवर खेळवण्यात येणाऱ्या पहिल्या सामन्यात विंडीजने चार दिवसात निकाल मिळवला पाहिजे, अन्यथा इंग्लंड संघ पाचव्या दिवशी पूर्ण फायदा उचलेल, असे लाराने म्हटले.
दोन्ही संघांमधील तीन सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना बुधवारी सुरू होत आहे. कोरोनामुळे मार्चच्या मध्यापासून क्रिकेट बंद होते. तब्बल तीन महिन्याच्या विश्रांतींतर क्रिकेटचे या मालिकेतून पुनरागमन होणार आहे.
या मालिकेत इंग्लंडचे पारडे जड असल्याचे लाराने स्पष्ट केले आहे. तो म्हणाला, ''विंडीजला त्वरित वर्चस्व गाजवावे लागेल. घरच्या मैदानावर इंग्लंडला सहज पराभूत करता येणार नाही. ते विजयाचे दावेदार आहेत."
लाराने विंडीजचा फेव्हरिट मानले असले तरी, त्याने विंडीजला काही सल्ले दिले आहेत. तो म्हणाला, ''विंडीजने इंग्लंडवर आपली छाप सोडली पाहिजे. विंडीजचा संघ पाच दिवस टिकेल असे मला वाटत नाही, त्यामुळे त्यांनी हा सामना चार दिवसात संपवला पाहिजे. त्यांनी आघाडी घेऊन त्यात सातत्य राखले पाहिजे."
विशेष म्हणजे कोरोनाव्हायरस नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जात आहे. अशा परिस्थितीत या मालिकेचा उत्साह प्रेक्षकांमध्येही शिखरावर आहे. उभय संघात ही मालिका विनाप्रेक्षक खेळण्यात येणार आहेत. दुसरा 16 ते 20 जुलै दरम्यान आणि तिसरा 24 ते 28 जुलै या काळात खेळवण्यात येणार आहे. हे दोन्ही सामने ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात खेळले जाणार आहेत. दरम्यान, खेळाडूंची राहण्याची व्यवस्था स्टेडियममध्ये किंवा त्यांच्या जवळपास असलेल्या हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.