नवी दिल्ली - युएईमध्ये खेळवला जात असलेला आयपीएलचा तेरावा हंगाम रंगतदार स्थितीत पोहचला आहे. या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज(सीएसके)चा संघ सर्वात अगोदर बाहेर पडला आहे. नवोदित खेळाडूंना संधी न देणे सीएसकेला भोवले असल्याचे मत वेस्ट इंडिजचा दिग्गज माजी खेळाडू ब्रायन लाराने व्यक्त केले आहे. आता शिल्लक राहिलेल्या औपचारिक सामन्यांमध्ये तरी संघ व्यवस्थापनाने अनुभवी खेळाडूंना विश्रांती देऊन नवोदितांना संधी द्यावी, असे लारा म्हणाला.
धोनीच्या संघाला 'डॅड्स आर्मी' असे म्हटले जाते. आयपीएलचा इतिहास बघता त्याने आतापर्यंतच्या हंगामामध्ये नवोदितांना संधी दिली होती. मात्र, या हंगामामध्ये धोनीने अनुभवी खेळाडूंवर विश्वास दाखवला व नवोदितांना खेळवले नाही. याचा फटका धोनीच्या संघाला बसला, असे लारा म्हणाला.
एका क्रीडा वाहिनीच्या आयपीएल विशेष कार्यक्रमात लारा बोलत होता. सीएसकेच्या संघावर नजर टाकली असता, त्यांच्याकडे अनुभवी खेळाडूंचाच भरणा असल्याचे दिसते. त्यांच्याकडे असलेली विदेशी खेळाडूंमध्येसुद्धा नवोदित खेळाडू नाहीत. तुलनेने बाकी संघांमध्ये अनुभवी व नवोदित असा मेळ दिसून येतो, असे लारा म्हणाला.
आयपीएलचा इतिहास बघता पहिल्यांदाच सीएसकेचा संघ लीग स्टेजमधून बाहेर पडला आहे. सध्या आठ गुणांसह सीएसके गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. मात्र, आता शिल्लक राहिलेल्या सामन्यांमध्ये चांगला खेळ करून ते पुढील वर्षासाठी एक चांगली पार्श्वभूमी तयार करू शकतात, असेही लारा म्हणाला.