मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. मात्र हा सामना या स्टेडियमवरून दुसऱ्या ठिकाणी हलवला जाऊ शकतो, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने सांगितले. उभय संघातील सामना 26 डिसेंबरला होणार आहे.
ही मालिका प्रेक्षकांसमोर खेळवण्यात यावी, असे टेलरने नमूद केले. तो म्हणाला, ''भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामना हस्तांतरित करता येईल. व्हिक्टोरियोमधील कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. ख्रिसमसपर्यंत एमसीजी दहा ते वीस हजार प्रेक्षकांना स्टेडियममध्ये स्थान देऊ शकते. आपल्याला हा सामना ऑप्टस स्टेडियम आणि अॅडलेड ओव्हल येथे आयोजित करता येईल.
ते पुढे म्हणाले, ''लोकांना अॅडलेडमध्ये भारतीय संघाला बघायला आवडेल. काही वर्षांपूर्वी भारत-पाकिस्तान सामन्यासाठी इथली तिकिटे 52 मिनिटांत विकली गेली होती.''
या वर्षाच्या शेवटी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, उभय संघातील पहिला कसोटी सामन्याला 3 डिसेंबरपासून सुरुवात होईल. हा सामना ब्रिस्बेन येथे होणार आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला अॅडलेड येथे दुसरा, 26 डिसेंबरला मेलबर्न येथे तिसरा आणि 3 जानेवारी 2021 मध्ये सिडनी येथे चौथा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.