मेलबर्न - यजमान ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंडविरुद्धची बॉक्सिंग डे कसोटी जिंकली. मेलबर्नच्या मैदानात खेळवण्यात आलेला हा सामना ऑस्ट्रेलिया २४७ धावांनी जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. पहिल्या डावात शतकी खेळी करणारा ट्रेविस हेड सामनावीर ठरला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने ट्रेविस हेडच्या शतकी (११४) खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ४६७ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर स्टिव्ह स्मिथ, टीम पेनस, मार्नस लाबुशेन यांच्या अर्धशतकांनी ऑस्ट्रेलियाला चारशेचा टप्पा पार करुन दिला. तेव्हा जागतिक कसोटी क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या पॅट कमिन्सने (५/२८) केलेल्या भेदक गोलंदाजीला जेम्स पॅटिन्सन (३/३४) आणि मिचेल स्टार्क (२/३०) यांची उत्तम साथ लाभल्यामुळे ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पहिला डाव १४८ धावांत गुंडाळला आणि ३१९ धावांची आघाडी मिळवली.
महत्वाचे म्हणजे, ३१९ धावांची आघाडी मिळूनही ऑस्ट्रेलियाने फॉलोऑन न लादणाऱ्या निर्णय घेतला आणि तिसऱ्या दिवसाअखेर दुसऱ्या डावात ४ बाद १३७ धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ५ बाद १६८ धावांवर आपला दुसरा डाव १६८ धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडसमोर ४८८ धावांचे लक्ष्य ठेवले.
ऑस्ट्रेलियाचे हे आव्हान न्यूझीलंडला झेपले नाही. त्याचा संपूर्ण संघ २४० धावांवर आटोपला. टॉम ब्लंडेलने २१० चेंडूत १२१ धावांची खेळी केली. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लिओन (४/८१), जेम्स पॅटिन्सन (३/३५) आणि मार्नस लाबुशेन (१/११) ने बळी घेतले.
दरम्यान, उभय संघात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने या मालिकेती पहिले दोनही सामने जिंकून २-० अशी आघाडी घेतली आहे. तिसरा आणि अखेरचा सामना सिडनीच्या मैदानात ३ ते ७ जानेवारी या दरम्यान, खेळवण्यात येणार आहे.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पीटर सिडलचा क्रिकेटला रामराम
हेही वाचा - "पाकिस्तान सरकार आणि पीसीबीने मला कोणतेही सहकार्य केले नाही"