मुंबई - क्रिकेटमध्ये प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या हॅरिस शिल्ड स्पर्धेत एक अजब घटना घडली. स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कुल आणि अंधेरीच्या चिल्ड्रन वेलफेअर या शाळांमध्ये रंगलेल्या सामन्यात चिल्ड्रन वेलफेअर शाळेचा संपूर्ण संघ शून्यावर बाद झाला. महत्वाची बाब म्हणजे, भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मा हा स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळेचा माजी विद्यार्थी आहे.
मुंबईच्या आझाद मैदानावर रंगलेल्या या सामन्यात स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळेने ३९ षटकांमध्ये ७६१ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल चिल्ड्रन वेलफेअर शाळेच्या संघाने सहा षटके फलंदाजी केली. परंतु या सहा षटकांमध्ये कोणत्याही खेळाडूला खातंही उघडता आले नाही. संपूर्ण संघ शून्यावर बाद झाला.
दरम्यान, या सामन्यात स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळेच्या मित मयेकरने ५६ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ३३८ धावा झोडपल्या. तर चिल्ड्रन वेलफेअर शाळेने तीन तासांमध्ये नियोजित षटके पूर्ण न केल्याने स्वामी विवेकानंद शाळेच्या संघाला १५६ अतिरिक्त धावा देण्यात आल्या होत्या. यामुळेच ७६२ धावांचे मोठे लक्ष स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळेने चिल्ड्रन वेलफेअर शाळेला दिले होते.
चिल्ड्रन वेलफेअर शाळेच्या फलंदाजांना एकही धाव करता आली नाही. चिल्ड्रन वेलफेअर शाळेच्या खात्यात जमा झालेल्या सात धावा अतिरिक्त आहेत. स्वामी विवेकानंद शाळेकडून खेळताना अलोक पालने तीन धावा देत सहा गडी बाद केले. तर कर्णधार वरोद वाजे याने तीन धावा देत दोन बळी टिपले.
हेही वाचा - भाऊ..ये गुलाबी 'चेंडू' में क्या खास है, पाहा 'ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट, दिपांशु मदनसोबत...
हेही वाचा - वानखडेवरील भारत-विंडीज टी-२० सामन्यावर अनिश्चततेचे सावट, 'हे' आहे कारण