मुंबई - आयपीएल-२०२० साठी निवडण्यात आलेल्या स्पर्धकांमध्ये 'काई पो चे' चित्रपटातील कलाकार दिग्विजय देशमुख याची एन्ट्री झाली आहे. 'मुंबई इंडियन्स'च्या संघाने २० लाखांची बोली लावून दिग्विजयला आपल्या संघामध्ये स्थान दिले आहे.
२१ वर्षीय असलेल्या दिग्विजयने 'काई पो चे' या चित्रपटात 'अली'ची भूमिका साकारली होती. त्यावेळी तो १४ वर्षांचा होता. या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेची प्रेक्षकांनी प्रशंसा केली होती. सध्या तो वेगवान गोलंदाज म्हणून क्रिकेट खेळतो.
हेही वाचा -आयपीएलच्या लिलावात चमकले 'हे' भारताचे युवा खेळाडू
दिग्विजय देशमुख हा मूळचा बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील वरप गावचा आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ९ बळी घेतले होते. त्याला फक्त दोन वेळा फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. तेव्हा त्याने एकवेळा १९ आणि दुसऱ्या वेळी १२ धावा केल्या होत्या.
रणजी ट्रॉफीमध्येही त्याने ६ बळी आणि ६१ धावा पूर्ण केल्या होत्या. हा सामना जम्मू-काश्मीर विरुद्ध खेळण्यात आला होता. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांचाही 'मुंबई इंडियन्स'मध्ये समावेश झाला आहे. दिग्विजयशिवाय मोहसीन खान, प्रिन्स बलवंत राय सिंग, नाथन कुल्टर नाइल आणि क्रिस लिन यांचाही मुंबई इंडियन्स संघात समावेश झाला आहे.
हेही वाचा -कटक वनडेपूर्वी कोहली कंपनीने घेतला ब्रेक, पाहा काय करताहेत तुमचे आवडते खेळाडू?