मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी आज आपला ४९वा वाढदिवस साजरा करीत आहे. १९७२मध्ये मुंबई येथे विनोद कांबळीचा जन्म झाला. भारतातील ख्यातनाम माजी क्रिकेटपटूंपैकी एक अशी विनोक कांबळीची ओळख आहे.
विनोद कांबळीचे नाव निघाल्यावर सर्वांना त्याची दिग्गज सचिन तेंडुलकरशी झालेली ऐतिहासिक भागीदारी आठवते. मुंबईतील प्रसिद्ध हॅरिस शिल्ड ट्रॉफीमध्ये शारदाश्रम शाळेसाठी या दोघांनी ६६४ धावांची संस्मरणीय भागीदारी रचली. त्यावेळी सचिनने ३२६ आणि कांबळीने ३४९ धावा केल्या. बालपणापासूनच सुरू झालेली त्यांची मैत्री आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहायला मिळाली.
![Birthday special of vinod kambali](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10287819_kambli.jpg)
मात्र, ९०च्या दशकात या दोघांच्या नात्यात बरेच अंतर दिसून आले. त्यानंतर विनोद कांबळी संघातून बाहेर गेला. कांबळीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत त्याने सुरुवातीच्या काळात अनेक विक्रम नोंदवले.
विनोद कांबळीची खास कामगिरी -
- कसोटी सामन्यात भारतासाठी सर्वात वेगवान १००० धावा करणारा फलंदाज (१४ डाव)
- वाढदिवशी शतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज. (वि. इंग्लंड, १९९३)
- सलग तीन डावात तीन शतके ठोकण्याचा विक्रम
- भारतासाठी कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम सरासरी (५४.२०)
कारकीर्द -
विनोद कांबळीने भारताकडून १७ कसोटी आणि १०४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यावेळी त्याने फलंदाजीसह (१०८४) ५४.२०च्या सरासरीने आणि एकदिवसीय सामन्यात (२४७७) ३२.५९च्या सरासरीने धावा केल्या. त्याने कसोटी सामन्यांच्या २१ डावांमध्ये ४ शतके आणि एकदिवसीय सामन्यात २ शतके ठोकली.