नवी दिल्ली - इंग्ल्डचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स सध्या त्याच्या 'ऑन फायर' या पुस्तकावरून चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने देखील स्टोक्सला पुस्तक प्रकरणावरून सुनावले होते. आता याच पुस्तकावरून आयपीएलच्या दोन संघांमध्ये चांगलीच जुंपली आहे.
हेही वाचा - अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, अंधेरीच्या क्रिकेटपटूला मिळाली संधी
आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स यांच्यात स्टोक्सच्या पुस्तकावरून सोशल मीडियावर चांगलीच जुंपली आहे. राजस्थान रॉयल्सने आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. 'बेन स्टोक्सचे पुस्तक वाचून खूप आनंद होईल. हे पुस्तक वाचण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. सनरायझर्स हैदराबाद, आपण या पुस्तकाची मागणी केली आहे का?', असा टोला लगावला. राजस्थानने सनरायझर्स हैदराबाद संघाच्या डेव्हिड वॉर्नरचा फोटोही या पोस्टसोबत शेअर केला आहे.

राजस्थानच्या या ट्विटचे सनरायझर्स हैदराबादनेही उत्तर दिले. 'आयपीएल २०२० मध्ये डेव्हिड वॉर्नरला जेव्हा चौथ्यांदा ऑरेंज कॅप मिळेल, तेव्हा त्यांना भेट म्हणून हे पुस्तक देण्यात येईल', असे मजेशीर उत्तर सनरायझर्सने दिले आहे.
नेमकं प्रकरण काय?
बेन स्टोक्सने आपल्या 'ऑन फायर' या पुस्तकामध्ये त्याने अॅशेसमधील केलेल्या खेळीचा आणि वॉर्नरचा उल्लेख केला आहे. यंदा झालेल्या अॅशेस मालिकेत स्टोक्सने अफलातून कामगिरी केली होती. या मालिकेदरम्यान हेडिंग्लेमध्ये खेळलेली सामनावीराची खेळी ही त्यावेळी वॉर्नरने केलेल्या स्लेजिंगचा परिणाम होती, असे स्टोक्सने आपल्या पुस्तकात म्हटले आहे.