मुंबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) त्रैमासिक बैठकीत बीसीसीआयला सांगितले होते, की भारताला जर २०२१ सालचा टी-ट्वेन्टी विश्वकरंडक आणि २०२३ सालचा एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धांचे आयोजन करायचे असल्यास करामध्ये सुट द्यावी लागेल. बीसीसीआयने करात सुट दिली नाही तर, विश्वकरंडकाचे आयोजनपद भारताकडून काढून घेण्यात येईल.
आयसीसीच्या या भूमिकेवर बोलताना बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, आयसीसी विश्वकरंडकाचे आयोजनपद भारताकडून काढून घेवू शकतो. यासाठी आमची हरकत नाही. करमाफी ही सरकारच्या हातात आहे, यासाठी मंजूरी मिळणे आवश्यक आहे. अशाप्रकारच्या दबावात येवून आम्ही आयसीसीची मदत करू शकत नाही.
आयसीसीने जर विश्वकरंडकाचे आयोजनपद काढून दुसरीकडे हलवल्यास बीसीसीआयही आयसीसीला देण्यात येणारा कमाईचा वाटा काढून घेईल. यानंतर बघुयात कोणाचे किती जास्त नुकसान होते. प्रशासनात असलेले लोक कोणत्याही कायद्याशिवाय नियम बनवायला बघतात. आयसीसीच्या अशाप्रकारच्या निर्णय मान्य करणे बीसीसीआयला शक्य नाही. अशा गोष्टी बोर्डाच्या हद्दीत येत नाहीत.
आयसीसी सर्वांना सोबत घेवून जाण्याच्या गोष्टी करते. परंतु, भारताला नुकसान पोहचवायचाच नेहमी त्यांचा प्रयत्न असतो. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला फक्त करात सुट मिळवण्यासाठी सांगितले जाते. परंतु, आम्हाला करात सुट मिळवलीच पाहिजे असे सांगितले जाते.