कोलकाता - भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची तब्येत आता स्थिर आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सौरव गांगुली यांना घरी जिममध्ये व्यायाम करत असताना, हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. यानंतर त्यांच्यावर एन्जियोप्लास्टी करण्यात आली होती. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
काही दिवसांनी पुन्हा सौरव गांगुली यांची तब्येत खराब झाली. त्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यादरम्यान, त्यांची पुन्हा एकदा एन्जियोप्लास्टी करण्यात आली.
आता उपचारानंतर गांगुली यांची तब्येत स्थिर असल्याने, डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. यासंदर्भात डॉक्टरांनी सांगितले की, 'गांगुली यांची तब्येत चांगली आणि स्थिर आहे. त्यांचे सर्व रिपोर्ट पाहून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.'
दरम्यान, गांगुली यांच्या हृदयाच्या तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक आढळून आले होते. यामुळे गांगुली यांच्यावर एका महिन्यात दोन वेळा एन्जियोप्लास्टी करण्यात आली आहे.
हेही वाचा - बुमराहने केली कुंबळेच्या गोलंदाजीची नकल, चेंडू वळला झपकन; पाहा व्हिडिओ
हेही वाचा - मुश्ताक अली टी-२० फायनल : बडोदा-तामिळनाडू जेतेपदासाठी झुंजणार