कोलकाता - बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. गांगुलीच्या जवळच्या सूत्रांनी ही माहिती दिली. गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशिष यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून गांगुलीसुद्धा होम क्वारंटाईन होता.
रुग्णालयात दाखल असलेले स्नेहाशिष आता बरे होत आहेत. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे (सीएबी) अध्यक्ष अभिषेक दालमिया हेसुद्धा स्नेहाशिष यांच्या संपर्कात आल्यापासून होम क्वारंटाईन आहेत.
कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने गांगुली आपल्या निवासस्थानाजवळील कार्यालयातून बीसीसीआयची सर्व कामे हाताळत आहे. कोरोना संसर्गामुळे भारतामध्ये गेल्या 24 तासात 700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 48 हजाराहून अधिक नवीन कोरोना पॉझिटिव्ह लोक सापडले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शनिवारी देशभरात कोरोना संसर्गाची एकूण प्रकरणे 13,36,861 वर पोहोचली आहेत.