कोलकाता - भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करत असतानाच त्याला अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर त्याला तत्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्यावर आज सांयकाळी अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली.
सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली -
वूडलँड हॉस्पिटलचे डॉ. आफताब खान यांनी सांगितले, की सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली आहे. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. पुढचे २४ तास गांगुलीला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाईल. त्याच्या हृदयात दोन ब्लॉकेजेस होती ती काढण्यात आली आहेत. त्यामुळेच त्याला त्रास जाणवत होता.
रुग्णालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेले मेडिकल बुलेटीन -
रुग्णालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटीननुसार, गांगुलीला माईल्ड कार्डियक अरेस्ट आला होता व सध्या त्यांची प्रकृती स्थिर व धोक्याच्या बाहेर आहे. डॉक्टर रुपाली बसु यांनी सांगितले की, ४८ वर्षीय सौरव गांगुलीला आज सकाळी घरच्या जिममध्ये ट्रेडमीलवर व्यायाम करताना छातीत दुखू लागले व त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली. त्याला आयएचडी Ø ई इस्केमिक हृदयरोगाचा कौटुंबिक इतिहास आहे. जेव्हा त्याला रुग्णालयात दुपारी १ वाजता दाखल करण्यात आले त्यावेळी त्याच्या हृदयाचे ठोके ७० हुन कमी पडत होते. तर रक्तदाब 130/80 mm असा सामान्य होता. त्याची इको टेस्ट व एचसीजी काढण्यात आला असून त्यामध्ये थोडी कॉम्लिकेशन्स दिसत आहेत. त्याच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
ममता बॅनर्जींचे ट्विट -
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबत एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे, की सौरव गांगुलीला माईल्ड कार्डियक अरेस्ट आल्याचे व त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे ऐकून वाईट वाटले. त्याला लवकर व पूर्ण बरे वाटू दे. माझ्या सदिच्छा त्याच्या व त्याच्या कुटूंबासोबत आहेत.
हेही वाचा - नवीन वर्ष टीम इंडियासाठी असणार 'पॉवरपॅक'..पाहा वेळापत्रक
राज्यपाल जगदीप धनकड यांच्याशी घेतली होती भेट -
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांची भेट घेतली होती. मात्र, ही राजकीय भेट नसून सदिच्छा भेट होती, असे सांगण्यात आले.
या बैठकीबाबत राज्यपाल धनकड यांनी माहिती दिली. ''बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीशी बैठक झाली. १८६४ मध्ये स्थापित झालेल्या इडन गार्डन्स मैदानाला भेट देण्याची गांगुलीची विनंती मी स्वीकारली आहे'', असे धनकड यांनी सांगितले होते. २०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर गांगुली भाजपावासी होतो का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, यासंबंधी काही बोलण्यास गांगुलीने नकार दिला होता.
यशस्वी भारतीय कर्णधार -
गांगुली २००० ते २००४ या काळात भारतीय संघाचा कर्णधार होता. तो भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. कसोटी पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्या डावात गांगुलीने १३१ धावा केल्या होत्या. यासह, तो पहिल्या कसोटी सामन्यात शतक ठोकणारा १०वा फलंदाज ठरला.
१९९२ मध्ये पदार्पण -
गांगुलीने १९९२मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याला केवळ तीन धावा करता आल्या आणि पुढील चार वर्षे तो संघाबाहेर राहिला. गांगुलीने भारतासाठी ११३ कसोटी आणि ३११ एकदिवसीय सामने खेळले. सध्या गांगुली बीसीसीआय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वी तो बंगाल क्रिकेट असोसिएशनचा (कॅब) अध्यक्षही राहिला होता.