मुंबई - विदेशी दौऱ्यात पत्नी, मुले आणि कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन जाणाऱ्या खेळाडूंमुळे बीसीसीआयसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार जे खेळाडू संघाचे नियमित सदस्य नाहीत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सांभाळणे अवघड काम झाले आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी विदेश दौऱ्यात पत्नीला सोबत ठेवण्याची मागणी केली होती.
भारतीय संघ काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱयावर गेला होता. यावेळी खेळाडूंच्या कुटुंबाला सांभाळणे अवघड झाले होते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळाडूंसोबत जाणाऱ्या कुटुंबातील सदस्यसंख्या जवळपास ४० एवढी होती. बीसीसीआयला एवढ्या सदस्यांची ने-आण करण्यासाठी भाड्याने बस घ्यावी लागली होती.
खेळाडुंसोबत विदेश दौऱ्यात कुटुंबातील सदस्यांना २ आठवडे राहण्याची परवानगी आहे. परंतु, बीसीसीआयसमोर यामुळे अडचणी वाढल्या आहेत. यासर्वांचे विमानाचे तिकिट, हॉटेल रुम आणि येण्या-जाण्याची व्यवस्था सर्वकाही बीसीसीआयला करावी लागते.