मुंबई - आयपीएल प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयपीएलचा चौदावा हंगाम भारतात खेळवण्यात येणार आहे. याचे संकेत बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आणि आयपीएल संचालन परिषदेचे सदस्य अरुणसिंग धुमल यांनी दिले आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये खेळवण्यात आला. यानंतर चौदावा हंगामाचे आयोजन देखील विदेशात करण्यात येईल, असा अंदाज व्यक्त होत होता. पण, भारतात कोरोनानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. अशात आयपीएलचे आयोजन विदेशात करण्याचा पर्याय खुला ठेवण्याची काही गरज नाही, असे मत अरुणसिंग धुमल यांनी व्यक्त केले आहे.
धुमल पुढे म्हणाले की, 'आम्ही भारतात आयपीएलच्या आयोजनासाठी काम करत आहोत. आम्ही सध्या बॅकअपबाबत विचार करीत नाही. आम्ही या स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यास उत्सुक आहोत. सध्या भारत यूएईच्या तुलनेत अधिक सुरक्षित आहे. आशा आहे की परिस्थिती गंभीर होणार नाही आणि त्यात सुधारणा होईल.'
हेही वाचा - कसोटी क्रमवारी : विराट कोहली चौथ्या स्थानी कायम
हेही वाचा - इंग्लंडचे भारत दौरे : दारुण पराभव ते २६/११ हल्ल्यातील शहिदांना वाहिलेला कसोटीविजय