मुंबई - इंडियन प्रीमियर लीगचा १४वा हंगाम ११ एप्रिलपासून सुरू होऊ शकतो. सुत्रांच्या माहितीनुसार, यंदाची आयपीएल स्पर्धा ११ एप्रिल ते ५ किंवा ६ जून दरम्यान होऊ शकते. बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने आयपीएलची तात्पुरती तारीख जवळपास निश्चित केली आहे.
हेही वाचा - इंग्लंडचा गोलंदाज म्हणतो, ''भारत अभेद्य नाही''
एका वृत्तानुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अंतिम निर्णय आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल घेईल, परंतु आयपीएलची तात्पुरती तारीख ११ एप्रिल निश्चित करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका मार्चमध्ये संपेल आणि त्यानंतर खेळाडूंना चांगली विश्रांती मिळेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका २८ मार्च रोजी संपेल. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ११ एप्रिलपासून आयपीएल आयोजित केल्यामुळे खेळाडूंना चांगला ब्रेक मिळेल, जेणेकरून ते 'फ्रेश' होतील आणि दीर्घ आयपीएलसाठी मैदानात परत येतील.
यंदाची आयपीएल भारतात
आयपीएलचा चौदावा हंगाम भारतात खेळवण्यात येणार आहे. याचे संकेत बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आणि आयपीएल संचालन परिषदेचे सदस्य अरुणसिंग धुमाळ यांनी दिले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये खेळवण्यात आला. यानंतर चौदावा हंगामाचे आयोजन देखील विदेशात करण्यात येईल, असा अंदाज व्यक्त होत होता. पण, भारतात कोरोनानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. अशात आयपीएलचे आयोजन विदेशात करण्याचा पर्याय खुला ठेवण्याची काही गरज नाही, असे मत अरुणसिंग धुमाळ यांनी व्यक्त केले आहे.
धुमाळ पुढे म्हणाले की, आम्ही भारतात आयपीएलच्या आयोजनासाठी काम करत आहोत. आम्ही सध्या बॅकअपबाबत विचार करीत नाही. आम्ही या स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यास उत्सुक आहोत. सध्या भारत यूएईच्या तुलनेत अधिक सुरक्षित आहे. आशा आहे की परिस्थिती गंभीर होणार नाही आणि त्यात सुधारणा होईल.