नवी दिल्ली - पाकिस्तानतील बालाकोटमध्ये भारतीय वायुसेनेने दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर बॉम्बचा वर्षाव केला. या हल्ल्यानंतर विश्वकरंडक स्पर्धेत भारत पाकिस्तानसोबत सामना खेळणार का नाही हा चर्चेचा विषय बनला आहे. परंतु, बीसीसीआयने अद्यापही याबाबत सरकारसोबत चर्चा केली नाही.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की सरकारने पाकिस्तानसोबत सामना खेळण्यास नकार दिल्यास बीसीसीआय या निर्णयाचे पालन करेल. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत विश्वकरंडकात खेळू नये, अशी मागणी जोर धरत आहे.
पाकिस्तानवर दबाव वाढण्यासाठी बीसीसीआयच्या बैठकीत विदेशी खेळाडूंना आयपीएल किंवा पाकिस्तान सुपर लीग या दोन्हीपैकी एका लीगमध्ये खेळण्याचा पर्याय देण्याचा विचार चालू होता. परंतु, सीओएतील २ सदस्यांनी याला चुकीचे ठरवताना स्पष्ट केले, की २ देशांच्या वैयक्तीक बाबतीत विदेशी खेळाडूंना सामिल करणे बरोबर नाही.