मुंबई - यंदा महिलांच्या आयपीएलबाबत योजना असल्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीने म्हटले आहे. महिलांच्या आयपीएलला 'चॅलेंजर सीरीज' म्हणून ओळखले जाते. बीसीसीआयची महिला क्रिकेट संघासाठी काही योजना नाही, असा अंदाज यापूर्वी वर्तवला जात होता.
रविवारी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीपूर्वी गांगुली म्हणाला, ''महिलांच्या आयपीएलची संपूर्ण योजना आहे आणि राष्ट्रीय संघासाठीही आमची योजना आहे.'' गांगुलीने महिला आयपीएलविषयी सविस्तर माहिती दिली नाही. परंतु या विषयाची माहिती असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की महिला चॅलेंजर गेल्या वर्षीप्रमाणे आयपीएलच्या अंतिम टप्प्यात घेण्यात येईल. ही स्पर्धा 1 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्याचे नियोजित असून यापूर्वीच या शिबिराचे आयोजन करता येईल.
भारतातील कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटना लक्षात घेता, यंदाची आयपीएल स्पर्धा युएईमध्ये 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.
आयपीएलमध्ये प्रेक्षक -
संयुक्त अरब अमिरातमध्ये (युएई) होणाऱ्या यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगसाठी (आयपीएल) 30 ते 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्याची इच्छा असल्याचे अमिरात क्रिकेट बोर्डाचे सचिव मुबाशशिर उस्मानी यांनी सांगितले आहे. 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांना मैदानात स्थान देण्याची परवानगी देण्याचा निर्णय (युएई) सरकारकडून घेण्यात येईल, असे आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पीटीआयला सांगितले.