कोलकाता(पश्चिम बंगाल)- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुली याला होम क्वारंटाइन व्हावे लागले आहे. कारण त्याचा मोठा भाऊ आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचा सहसचिव स्नेहाशिष गांगुली यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
स्नेहाशिष गांगुली यांना बेले वुई क्लिनिक मध्ये दाखल करण्यात आले आहे, असे क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या सूत्रांनी सांगितले. बुधवारी स्नेहाशिष गांगुली यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची सूत्रांची माहिती आहे.
सौरव आणि स्नेहाशिष एकाच घरात राहत असल्याने नियमानुसार सौरव गांगुलीच्या घरातील व्यक्तींना होम क्वारंटाइन व्हावे लागले, अशी माहिती गांगुली कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी दिली आहे.
स्नेहाशिष यांची पत्नी आणि कुटुंबातील नातेवाईक यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ते मोमीनपूर येथून सौरव गांगुलीकडे राहण्यासाठी गेले होते.
स्नेहाशिष गांगुली यांना दोन दिवसांपासून ताप आला होता. बुधवारी त्याची तपासणी केली असता, त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्या नंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागील महिन्यात स्नेहाशिष यांना कोरोना झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या.