ढाका - राष्ट्रीय क्रिकेट लीग-2018 मधील डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल बांगलादेशचा क्रिकेटपटू काझी आनिक इस्लामला दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या चाचणीत अपयशी ठरल्यानंतर त्याला बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या सर्व कार्यक्रमातून काढून टाकण्यात आले आहे.
आनिक 2018 मध्ये खेळल्या गेलेल्या 19 वर्षांखालील वर्ल्डकपचा भाग होता. आनिकला मेथाम्फेटामाइन सेवन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. 2018 मध्ये आयसीसीने बंदी घातलेल्या पदार्थांच्या यादीमध्ये मेथाम्फेटामाइन समाविष्ट आहे.
फेब्रुवारी 2019 मध्ये, अनिकने याची कबुली दिली होती. बीसीबीने म्हटले आहे, ''आनिकची ही पहिली घटना असल्याने त्यांचे निलंबन 8 फेब्रुवारी 2019 पासून सुरू होत आहे. तो 7 फेब्रुवारी 2021 पासून पुन्हा क्रिकेट सुरू करू शकेल.''
आनिक 2018 च्या 19 वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये बांगलादेशकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. डावखुऱ्या आनिकने 10 गडी बाद केले. त्याने वरिष्ठ क्रिकेटमध्ये चार प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्याचबरोबर 26 लिस्ट ए आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत.