साउदम्पटन - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशने अफगाणिस्तानवर ६२ धावांनी पराभव केला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत अफगाणिस्तानला २६३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ २०० धावांवर बाद झाला. या विजयामुळे बांगलादेशने गुणतालिकेत ७ सामन्यात ७ गुणांसह पाचवे स्थान पटकावले आहे. दरम्यान सामन्यापूर्वि अफगाणिस्तानच्या कर्णधारांनी हम तो डूबे हैं सनम, तुमको लेकर डूबेंगे... असे म्हणले होते. मात्र, असे म्हणणारे स्वतःच डूबले आहेत.
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून बांगलादेशला फलंदाजीसाठी पाचारण केले. बांगलादेशने फलंदाजी करताना ७ गड्यांच्या मोबदल्यात २६२ धावा केल्या. बांगलादेशसाठी मुशफिकूर रहीमने ८३ तर आणि शाकिब अल हसनने ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर गोलंदाजीत अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमानने सर्वाधिक ३ विकेट घेतले, तर नैबने २ आणि झादरान आणि नबी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
बांगलादेशने दिलेल्या २६३ धावांचे आव्हानाला समोरे जाताना अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी सावध सुरूवात केली. मात्र, शाकिब अल हसनच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर बांगलादेशने अफगाणिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. शाकिबने गुलबदिन नैब, रहमत शाह, अफगाण, मोहम्मद नबी आणि नजीबुल्लाह या ५ फलंदाजांना माघारी धाडले. शाकिबने सामन्यात अर्धशतकी खेळी आणि ५ गडी टिपल्याने त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.