ढाका - ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणारी न्यूझीलंडविरूद्धची कसोटी मालिका बांगलादेशने स्थगित केली आहे. ही मालिका बांगलादेशमध्ये होणार होती. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) मंगळवारी ही माहिती दिली.
बीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी यांनी सांगितले, ''सध्या कोरोनाचा कहर पाहता ऑगस्ट 2020 मध्ये संपूर्ण क्रिकेट मालिका आयोजित करणे आव्हानात्मक असेल. खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि संबंधित भागधारकांचे हित पाहता आम्ही कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही."
ते म्हणाले, "या परिस्थितीत बीसीबी आणि एनझेडसीने ही मालिका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खेळाडू आणि अधिकारी आणि दोन्ही संघ निराश होतील. परंतु मला वाटते की न्यूझीलंडलाही ही परिस्थिती समजली आहे."
ही मालिका आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग होती. न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. बांगलादेशात आतापर्यंत कोरोनाच्या 115786 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1502 लोकं मरण पावले आहेत.