ढाका - बांगलादेशच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार तमिम इक्बाल आणि टी-20 कर्णधार महमूदुल्लाह रियाध यांनी कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये (सीपीएल) न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तमिम आणि महमूदुल्लाह सीपीएलमधील संघ जमैका तालावाजसाठी खेळणार होते.
महमूदुल्ला म्हणाला, "मी संघासोबत करार करणार होतो. परंतु माझे कुटुंब चिंतेत आहेत. या क्षणी माझ्या प्रवासाबद्दल त्यांनाही चिंता वाटत आहे. मी यापूर्वी सीपीएलमध्ये खेळलो आहे. मी तेथे नेहमी खेळण्याचा आनंद लुटला आहे.''
दुसरीकडे, तमिम 2013 मध्ये सेंट लुसियाकडून खेळला होता. ढाका प्रीमियर लीगसाठी स्वत:ला उपलब्ध करून देण्यासाठी त्याने सीपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तमिम म्हणाला, ''एका संघामार्फत माझ्याकडे संपर्क साधण्यात आला होता. परंतु आमची स्थानिक स्पर्धा कधीही सुरू होऊ शकते. म्हणून मी तेथे न जाण्याचे ठरवले.''
सीपीएलचा आठवा हंगाम 18 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान प्रेक्षकांशिवाय खेळवला जाणार आहे.