लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये खेळाडूंना दुखापतीचे ग्रहण लागले आहे. आता बांगलादेशचा अनुभवी फलंदाज महमूदुल्लाहला दुखापत झाली आहे. सोमवारी अफगाणिस्तानविरुध्द फलंदाजी करत असताना महमूदुल्लाहच्या पायाला दुखापत झाली. मिळालेल्या माहितीनुसार, महमूदुल्लाह दुखापतीमुळे पुढील १० दिवस खेळू शकणार नाही. हा बांगलादेशसाठी मोठ्ठा धक्का मानला जात आहे.
अफगाणिस्तानविरुध्द फलंदाजीदरम्यान धाव घेताना महमूदुल्लाहच्या पायाला दुखापत झाली. या कारणाने महमूदुल्लाहने क्षेत्ररक्षण केले नाही. महमूदुल्लाहची दुखापत जर गंभीर असल्यास बांगलादेशसाठी हा धक्का मानला जात आहे. बांगलादेशचा पुढील सामना २ जुलैला भारताविरुध्द होणार आहे. तर त्यानंतर त्यांचा सामना ५ जुलैला पाकिस्तानविरुध्द होणार आहे.
बांगलादेशने अफगाणिस्तानचा ६२ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीच्या आशा पल्लवीत ठेवल्या आहेत. बांगलादेश ७ सामने खेळले असून त्यात ३ विजय मिळवत गुणतालिकेत ७ गुणांसह पाचव्या नंबरवर आहे.