सिडनी - ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने फिरकीपटू नाथन लायनला भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेच्या शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघात स्थान दिले आहे. भारत-अ संघाबरोबर खेळल्या जाणार्या सराव सामन्यासाठी कॅमरुन ग्रीनला टी-२० संघातून सोडण्यात आले आहे.
हेही वाचा - अँडरसनचा न्यूझीलंडला 'रामराम', अमेरिकेकडून खेळणार क्रिकेट
टी-२० संघात लायनचा समावेश हा एक आश्चर्यकारक निर्णय आहे. या प्रकारात त्याने फक्त दोन सामने खेळले आहेत. त्यांनी अखेरचा टी-२० सामना २०१८मध्ये खेळला होता. भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला ११ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झम्पा आणि मिचेल स्वेप्सन हे दोन फिरकीपटू खेळले होते. रविवारी सिडनी क्रिकेट मैदानावर भारताला दुसरा टी-२० सामना खेळायचा आहे.
भारताच्या नावावार पहिला टी-२० सामना -
पदार्पणवीर टी. नटराजन आणि युझवेंद्र चहल यांनी केलेल्या दमदार गोलंदाजीमुळे पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ११ धावांनी विजय नोंदवला. रवींद्र जडेजाचा 'कन्कशन सबस्टिट्युट' म्हणजेच बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या चहलने ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंच, स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू वेडला बाद करत यजमान संघाच्या डावाला खिंडार पाडले. २० षटकात ऑस्ट्रेलियाचा संघ ७ बाद १५० धावा करू शकला. चहलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.