मुंबई - भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून २ सामन्यांची टी-ट्वेन्टी मालिका सुरू होणार आहे. विशाखापट्टणम येथे पहिला सामना होणार आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच म्हणाला, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत चांगले प्रदर्शन करुन खेळाडूंना संघातील स्थान निश्चित करण्याची चांगली संधी असणार आहे.
अॅरोन फिंच म्हणाला, की आम्हांला सध्या संघाचे संतुलन साधायचे आहे. सगळे हाताबाहेर गेले आहे, असे मला अद्यापही वाटत नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रयोग करण्यात आणखी संधी आहे. मी याआधी मध्यक्रमात फलंदाजीसाठी येत होतो. त्यामुळे इतर खेळाडूंसाठी संघातील स्थान पक्के करण्यासाठी ही मोठी संधी असणार आहे.
स्मिथ-वॉर्नरच्या पुनरागमनाविषयी बोलताना फिंच म्हणाला, सध्या दोघेही कोपऱयाच्या दुखापतीने त्रस्त आहेत. दोघांचे संघात पुनरागमन झाल्यानंतर संघाचे निश्चित मनोबल वाढेल. दोघेही विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी संघात पुनरागमन करतील याची आणखी शाश्वती नाही.
ऑस्ट्रेलिया संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध २ टी-ट्वेन्टी आणि ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-ट्वेन्टी मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. तर, दुसरा सामना बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरती होणार आहे.