अबुधाबी - चेन्नई सुपर किंग्जचे (सीएसके) गोलंदाजी सल्लागार एरिक सिमन्स यांच्या म्हणण्यानुसार, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि अन्य ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यूकेमध्ये जैव-सुरक्षित वातावरणात असूनही इंडियन प्रीमियर लीगसाठी (आयपीएल) संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) सहा दिवस क्वारंटाइन असतील.
स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि जोश हेजलवूड बुधवारी इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यानंतर थेट ब्रिटनहून यूएईला रवाना होतील. इंग्लंडमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेतदरम्यान ते जैव-सुरक्षित वातावरणात आहे. सिमन्स म्हणाले, ''नियमांमध्ये कोणतीही शिथिलता मिळणार नाही आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंना त्यांच्या संघात सामील होण्यापूर्वी किमान सहा दिवस क्वारंटाइन राहण्याची आवश्यकता आहे.''
सिमन्स म्हणाले, "आम्ही हे ऐकून आहोत. मात्र, संघात येण्यापूर्वी सहा दिवस त्याच्या खोलीत एकांतात राहण्याव्यतिरिक्त पहिल्या, तिसर्या आणि सहाव्या दिवशी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह असणे आवश्यक आहे.'' कोरोनामुळे यावेळी आयपीएलचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होत आहे. दुबई, अबू धाबी आणि शारजाह ही तीन यूएई शहरे १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत लीगचे आयोजन करतील. गतविजेत्या मुंबईचा आणि लीगचा पहिला सामना १९ नोव्हेंबरला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होईल.
आयपीएलचा १३वा हंगाम ५३ दिवसांचा आहे. नव्या वेळापत्रकानुसार, २४ सामने दुबई, २० सामने अबूधाबी आणि १२ सामने शारजाहमध्ये खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेतील सायंकाळचे सामने भारतीय वेळेनुसार, ७ वाजून ३० मिनिटांनी सुरू होतील, तर डबल हेडरचे १० सामने दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरू होतील. बीसीसीआयने साखळी सामन्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्ले-ऑफ आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.