लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील ऑस्टेलिया विरुध्द श्रीलंका या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा ८७ धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने गुणतलिकेत ८ गुणासह प्रथम क्रमांक पटकावला आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चुकीचा ठरवत ऑस्ट्रेलियाने कर्णधार अरोन फिंचच्या दीडशतकी खेळीच्या बळावर ३३४ धावांचा डोंगर उभा करून श्रीलंकेसमोर कठीण आव्हान ठेवले. चांगल्या सुरूवातीनंतरही श्रीलंकेचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला व श्रीलंकेचा डाव २४७ धावांवर आटोपला.
ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर सगळ्या आघाड्यावर वर्चस्व निर्माण केले. ३३५ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरूवात चांगली झाली. मात्र, ठराविक अंतराने विकेट पडत गेल्याने श्रीलंकेचा डाव २४७ धावांवर आटोपला. मिचेल स्टार्कने १० षटकात ५५ धावा देत ४ बळी घेत लंकन फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याला केन रिचर्डसनने ३ बळी घेत त्याला चांगली साथ दिली. पॅट कमिन्स २ आणि जेसन बेहरनडॉर्फ याने एक बळी मिळवला.
प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियन कर्णधार अरॉन फिंच, स्टिव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरोधात ३३४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी लंकेच्या सर्वच गोलंदाजांची धुलाई करत धावांचा डोंगर उभा केला. यात कर्णधार अरॉन फिंचने १५३, स्टिव्ह स्मिथने ७३ तर ग्लेन मॅक्सवेलने ३९ धावांची खेळी केली.