वेलिंग्टन - न्यूझीलंडमधील ऑकलंड शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यामुळे ऑकलंड शहर ७ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. याचा फटका न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया पुरूष आणि न्यूझीलंड-इंग्लंड महिला यांच्यातील क्रिकेट सामन्याला बसला आहे. हे दोन्ही सामने आता वेलिंग्टनमध्ये खेळवले जाणार आहेत.
न्यूझीलंडच्या महिला पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, ऑकलंडसह मोठ्या शहरात लॉकडाऊन घोषित केला आहे. यानंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने क्रिकेट सामने स्थलांतरित करण्यात आल्याची घोषणा केली आहे.
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया पुरूष संघातील चौथा टी-२० सामना ऑकलंडमध्ये खेळला जाणार होता. तर दुसरीकडे न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्या महिला संघातील टी-२० सामना टौरंगा येथे नियोजित होता. पण हे दोन्ही सामने आता वेलिंग्टनमध्ये ते ही विनाप्रेक्षक खेळवले जाणार आहेत.
न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्याच्या टी-२० मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत २-० ने आघाडी घेतली आहे. उभय संघातील तिसरा आणि चौथा सामना वेलिंग्टनमध्ये होणार आहे. तिसरा सामना ३ मार्च रोजी खेळला जाणार आहे.
हेही वाचा - भारतीय संघच खेळणार WTC चा अंतिम सामना, पाकिस्तानला पूर्ण विश्वास, त्यामुळेच त्यांनी....
हेही वाचा - IND vs ENG : अखेरच्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाचा कस्सून सराव