सिडनी - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरूवारपासून (ता. ७) तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे. या कसोटीसाठी केवळ 25 टक्के प्रेक्षकांना मैदानावर येण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले.
सिडनीमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर न्यू साऊथ वेल्सच्या सरकारच्या सल्ल्याने ही मागणी करण्यात आली. पूर्वी ५० टक्के प्रेक्षकांना मैदानावर येण्याची परवानगी होती. आता ती २५ टक्के इतकी घटवण्यात आली आहे.
सिडनी क्रिकेट ग्राउंडची एकूण प्रेक्षक क्षमता ३८ हजार इतकी आहे. पण तिसऱ्या कसोटीसाठी जवळपास ९ हजार ५०० प्रेक्षकांनाच मैदानावर येण्याची परवानगी मिळणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यासंबंधी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले यांनी निवेदनात म्हटलं आहे की, 'कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे व्यवस्थित पालन केले जावे, यासाठी एससीजीची क्षमता घटवणे गरजेची होती. त्यामुळे तिकीट विकत घेतलेल्या प्रेक्षकांनी संयम दाखवल्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो. या प्रेक्षकांचे पैसे आम्ही आज परत करणार आहोत. त्यानंतर सीएसजीची बैठक व्यवस्था निश्चित करुन पुन्हा तिकीट विक्री सुरू करण्यात येईल.'
सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोन एकदिवसीय आणि दोन टी-२० सामने खेळवण्यात आले होते. पहिल्या तीन सामन्यात १८ हजार प्रेक्षक सामना पाहण्यासाठी मैदानावर आले. तर ८ डिसेंबर रोजी झालेला तिसरा टी-२० सामना पाहण्यासाठी ३० हजार प्रेक्षकांची उपस्थिती मैदानात होती.
दरम्यान, सिडनी परिसरातील कोरोनाचा संसर्ग वाढल्याने तिसरा कसोटी सामना सिडनीहून मेलबर्नला हालवण्याचा विचार क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सुरु होता. पण, अखेर सिडनी क्रिकेट ग्राउंडवरच हा सामना खेळवण्याचे निश्चित झाले. उभय संघात चार सामन्याची कसोटी मालिका सुरू आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला. त्यानंतर भारतीय संघाने दुसरा सामना जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
हेही वाचा - अजिंक्यचा जन्मच क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्यासाठी झाला; दिग्गजाने केली प्रशंसा
हेही वाचा - टीम इंडियाला दिलासा; वादानंतर संपूर्ण संघाचा कोरोना रिपोर्ट आला निगेटिव्ह