गुजरात - बडोदा क्रिकेट असोसिएशनने (बीसीए) महिला संघाचे प्रशिक्षक अतुल बेदाडे यांना निलंबित केले आहे. महिला खेळाडूंनी बेदाडे यांच्यावर लैंगिक छळ आणि सार्वजनिक ठिकाणी लज्जास्पद वर्तनाचा आरोप ठेवला आहे. गेल्या महिन्यात हिमाचल प्रदेशमधील एका स्पर्धेदरम्यान ही घटना घडली होती.
हेही वाचा - कौतुकास्पद...कोरोनाग्रस्तांसाठी फुटबॉलपटू देणार आपले मानधन
'तात्काळ प्रभावाने बेदाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. लवकरच एक समिती स्थापन करून चौकशी सुरू केली जाईल. या समितीत एक सदस्य बीसीएच्या बाहेरचा असेल', असे बीसीएचे सचिव अजित लेले म्हणाले आहेत. तर, बेदाडे यांनी स्व:तावरचे आरोप फेटाळून लावले आहेत. 'माझ्यावरील सर्व आरोप निराधार व तथ्यहीन आहेत. लवकरच मी माझी बाजू ठेवेन', असे बेदाडे यांनी म्हटले.
बेदाडे यांनी भारतासाठी १३ एकदिवसीय सामन्यांमध्ये १५८ धावा केल्या आहेत. ते बडोदा पुरुष क्रिकेट संघाचे प्रशिक्षकही राहिले आहेत. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांची महिला संघाच्या प्रशिक्षकपदी वर्णी लागली होती.