लंडन - प्रतिष्ठित अॅशेस मालिकेत, इंग्लंडचा जलदगती गोलंदाज ओली स्टोन दुखापतीमुळे संपूर्ण मालिका खेळू शकणार नाही. हा इंग्लंडला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
ओली स्टोन याला वेस्ट इंडीज दौऱ्यामध्ये दुखापत झाली होती. यामुळे तो काही दिवसांपासून क्रिकेटपासून लांब होता. दुखापतीतून सावरल्यानंतर तो जुलैमध्ये आयर्लंडविरुध्दच्या कसोटी सामन्यात मैदानात उतरला. या कसोटीत त्याने पहिल्या डावात तीन विकेट घेत संघाच्या विजयात हातभार लावला होता.
या कारणाने त्याची निवड अॅशेस मालिकेसाठी करण्यात आली. मात्र, त्याला ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात अंतिम ११ मध्ये संधी देण्यात आली नाही. स्टोनला मागील आठवड्यात ट्रेनिंग दरम्यान पाठीच्या खालच्या बाजूस दुखापत झाली होती. तपासणी अंती ही दुखापत गंभीर असल्याने, तो अॅशेस मालिका खेळू शकणार नाही.
यापूर्वी इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनला मालिकेच्या पहिला कसोटी सामन्यात दुखापत झाली यामुळे तो दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. अँडरसन नंतर आता स्टोन यांच्या दुखापतीने इंग्लंडचा संघ अडचणीत आला आहे.