मेलबर्न - ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात दुसरा कसोटी सामना ८ गडी राखून जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. विजयी सामन्यात अजिंक्यने कर्णधाराला साजेशी शतकी खेळी साकारली. यानंतर अजिंक्य रहाणेवर कौतूकाचा वर्षाव झाला. आता इंग्लंडचे दिग्गज क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी देखील अजिंक्यची प्रशंसा केली आहे.
चॅपल यांनी एका क्रीडा संकेस्थळासाठी कॉलम लिहलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, 'अजिंक्यने मेलबर्न कसोटीत भारतीय संघाचे शानदार नेतृत्व केले. ही आश्चर्याची बाब नाही. कारण कोणत्याही व्यक्तीने त्याला 2017 साली धर्मशाळा येथे नेतृत्व करताना पाहिले असेल, तर तो व्यक्ती समजेल की, या माणसाचा जन्म क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्यासाठी झाला आहे.'
अजिंक्य रहाणेने २०१७ मध्ये भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले होते. या सामन्याची आणि मेलबर्न कसोटीची तुलना करताना चॅपल म्हणाले की, 'मेलबर्नमधील सामना आणि 2017 सालचा सामना यात बरेच साम्य आहे. पहिली गोष्ट म्हणजे दोन्ही सामने कठीण प्रतिस्पर्धी विरुद्ध होते. परंतु पहिल्या डावात जडेजाचे महत्वाचे योगदान आणि शेवटी अजिंक्य रहाणेची मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करताना वेगाने धावा करत फलंदाजी केली.'
अजिंक्यने धर्मशाळा येथील सामन्यात माझे लक्ष वेधले. जेव्हा त्याने, शतकी भागिदारी रचलेल्या डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांची जोडी फोडण्यासाठी पदार्पण करणार्या कुलदीप यादवला आक्रमणासाठी बोलवले. हे एक धाडसी पाऊल होते. मला वाटतं, त्याची ही रणणिती यशस्वी ठरली. यादवने वॉर्नरला बाद केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला, अशी आठवण चॅपल यांनी सांगितली.
धाडस आणि चलाखी हे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाच्या यशाचे गमक आहे. जेव्हा घेतलेले निर्णय उलटे पडतात तेव्हा तो शांत राहतो. त्याने आपल्या साथीदारांचा सन्मान जिंकला आहे. जो की नेतृत्वाचा सर्वात मोठा भाग असतो. तो गरजेच्या वेळी धावा काढतो. ज्यामुळे संघातील खेळाडूंच्या मनात त्याच्याबद्दल सन्मान वाढतो, असे देखील चॅपल यांनी सांगितलं.