मुंबई - अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात चार सामन्याची बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ ने जिंकली. यानंतर अजिंक्यच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला. अजिंक्यने केलेल्या कामगिरीचा अभिमान तर आहेच, सोबतच त्याच्या टीमने अनुभव नसताना देखील मोठी कामगिरी केली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया अजिंक्य रहाणेचे वडील मधुकर रहाणे यांनी दिली.
'ईटीव्ही भारत'शी बोलताना मधुकर रहाणे म्हणाले की, 'सर्वासाठीच खूप आनंदाचा क्षण आहे. आम्ही घरात देखील गोड पदार्थ बनवले आहेत. नातेवाईकांचे देखील अभिनंदन करण्यासाठी फोन येत आहेत. ज्या प्रकारे आज भारतीय संघ खेळला त्यांचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे आहे. जसे फिनिक्स पक्षी भरारी घेतो, तशाप्रकारे शेवटच्या क्षणी भारतीय संघाने या सामन्यांमध्ये भरारी घेतली. युवा खेळाडूने त्यांचा खेळ 100 टक्के दाखवून दिला.'
ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्यशी बोलने झाले का? असे विचारले असताना मधुकर रहाणे यांनी सांगितले की, 'अजिंक्यला अभिनंदन करण्यासाठी फोन केला होता. त्याचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. पण जास्त बोलता आले नाही. तो आल्यानंतर सविस्तर याविषयी बोलेन.'
दरम्यान, भारतीय संघाने गाबाच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा धक्कादायक पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि तुफानी ऋषभ पंत (नाबाद ८५) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने हा सामना तीन गडी राखत जिंकला. या विजयासाह बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत २-१ ने बाजी मारली.
रहाणे नेहमी 'अजिंक्य'
मराठमोळया अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाचा एकदाही पराभव झाला आहे. अजिंक्यने २०१८ मध्ये अफगानिस्तान विरोधात भारतीय संघाचे पहिल्यांदा नेतृत्व नेतृत्व केले होते. त्यानंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात एका सामन्यात भारताला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यात देखील भारतीय संघाने विजय मिळवला आहे.