मुंबई - टीम इंडिया आणि राजस्थान रॉयल्सचा फलंदाज अजिंक्य रहाणे एका नवीन संघात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा संघ रहाणेला आपल्या संघात घेण्यास इच्छूक आहे. त्यामुळे २०२० च्या आयपीएल स्पर्धेत रहाणे दिल्लीच्या संघाकडून खेळताना दिसून येऊ शकतो.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या संघाची राजस्थान रॉयल्ससोबत यासंबंधी चर्चा सुरु आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, 'दिल्ली कॅपिटल्सचा संघ रहाणेला आपल्या संघात घेण्यास इच्छूक आहे. पण, हा करार लवकरच होईल याची पुष्टी नाही. खूप गोष्टींची दखल घ्यावी लागेल. कारण, रहाणे हा खूप कालावधीसाठी राजस्थान रॉयल्ससोबत जोडलेला आहे. त्यामुळे चर्चा सुरु आहेत.'
२००८ आणि २००९ च्या आयपीएलमध्ये रहाणे मुंबई इंडियन्ससाठी खेळला होता. २०१० मध्ये रहाणे आयपीएल खेळला नव्हता. २०११ मध्ये तो राजस्थान रॉयल्सचा सदस्य झाला होता. त्यानंतर, या संघावर दोन वर्षांची बंदी घातल्यामुळे रहाणे पुणे संघाकडून खेळला होता. त्यानंतर त्याने परत राजस्थानच्या संघामध्ये पुनरागमन केले.