हैदराबाद - अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू राशिद खान हा सध्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांकाचा फिरकीपटू आहे. जगभरातील टी-20 लीगमध्येही त्याने आपली चांगली कामगिरी दर्शवली आहे. ''जेव्हा अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ वर्ल्डकप जिंकेल, तेव्हा मी लग्न करेन'', असे तो म्हणाला.
अफगाणिस्तानच्या एका रेडिओवरील कार्यक्रमात राशिदने आपल्या लग्नाविषयी प्रतिक्रिया दिली. 21 वर्षीय राशिदची आपल्या संघासाठी मोठी स्वप्ने आहेत, त्याला आपल्या देशासाठी विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्याची इच्छा आहे. तो आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच)कडूनही खेळतो. जगातील टी-20 फ्रेंचायझी क्रिकेट खेळल्यानंतर त्याची गोलंदाजी अधिक बळकट ठरली आहे. तो मर्यादित षटकांच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. गोलंदाजीशिवाय तो एक चांगला फलंदाज असल्याचेही त्याने सिद्ध केले आहे.
राशिदने आतापर्यंत 211 टी-20 सामने खेळले असून त्यात 296 विकेट्स घेतल्या आहेत. अफगाणिस्तान संघासाठी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 23, एकदिवसीय सामन्यात 133 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 89 बळी घेतले आहेत.