लखनऊ - वेस्ट इंडीजचा १४० किलो वजनी आणि ६.५ फुट उंचीचा रहकिम कॉर्नवॉलने आपल्या फिरकीच्या तालावर अफगाणिस्तानच्या फलंदाजांना नाचवले. सध्या अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियममध्ये अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडीज संघात एकमात्र कसोटी सामना रंगला आहे. या सामन्यात फिरकीपटू रहकिमच्या गोलंदाजीमुळे वेस्ट इंडीजने दुसऱ्या दिवसाअखेर सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.
वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा रहकिमच्या फिरकी जाळ्यात अफगाणिस्तानचा पहिला डाव १८७ धावांवर आटोपला. रहकिमने पहिल्या डावात ७५ धावा देत ७ गडी बाद केले. त्यानंतर वेस्ट इंडीजने आपल्या पहिल्या डावात शमर ब्रुक्सच्या (१११) शतकी खेळीच्या जोरावर सर्वबाद २७७ धावा केल्या.
विडींजच्या गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानचा दुसरा डावही गडगडला. दुसऱ्या दिवसाअखेर अफगाणिस्तानने ७ बाद १०९ धावा केल्या आहेत. सद्य स्थितीत अफगाणिस्तानकडे १९ धावांची माफक आघाडी आहे. अद्याप अफगाणिस्तानचे तीन गडी शिल्लक आहेत. दुसऱ्या डावात रहकिम, रोस्टन चेज यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.
दरम्यान, रहकिमच्या फिरकी माऱ्यासमोर अफगाणिस्तानचे फलंदाज फार काळ टिकू शकले नाही. रहकिमने दोन्ही डावात मिळून अद्याप एकूण १० गडी बाद केले आहेत.
हेही वाचा - हॅमिल्टन कसोटी : उभय संघाला दुखापतीचे ग्रहण; बोल्ट, ग्रँडहोम नंतर इंग्लंडचा 'हा' खेळाडू जायंबदी
हेही वाचा - पाकचा 'हा' गोलंदाज ठरतोय स्टिव्ह स्मिथसाठी कर्दनकाळ, १० मधून ७ वेळा केलं बाद