मुंबई - दक्षिण आफ्रिकेचा माजी आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलिअर्स इंग्लंड येथील टी-ट्वेन्टी लीगमध्ये खेळणार आहे. यासाठी एबी डिव्हिलिअर्स मिडलसेक्स या कॉउंटी क्रिकेट क्लबशी करारबद्ध झाला आहे.
टी-ट्वेन्टी ब्लास्ट या स्पर्धेत गेल्यावर्षी मिडलसेक्सचा संघ गुणतालिकेत तळाशी होता. १४ सामन्यांपैकी संघाला केवळ २ सामने जिंकता आले होते. संघाने मागील हंगामातील अपयश धुवून काढण्यासाठी टी-ट्वेन्टी स्पेशालिस्ट एबी डिव्हिलिअर्सला संघात घेतले आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात एबीने बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये खेळताना चांगली कामगिरी केली होती. रंगपूर रायडर्सचे प्रतिनिधित्व करताना एबीने ५० चेंडूत १०० धावा केल्या होत्या.
गेल्यावर्षी मे महिन्यात सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रिय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करुन एबी डिव्हिलिअर्सने क्रिकेट जगताला धक्का दिला होता. निवृत्ती घेण्यापूर्वी एबी चांगल्या फॉर्मात होता. निवृत्त होण्यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत ७१.१६ च्या सरासरीने ४२१ धावा केल्या होत्या. ही मालिका आफ्रिकेने ३-१ अशी जिंकली होती. मला विविध देशांतील टी-ट्वेन्टी लीगमध्ये भाग घ्यायचा आहे, असे एबीने निवृत्तीनंतर जाहीर केले होते.