शारजाह - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या लढतीत सामनावीर ठरला. त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील हा २२वा सामनावीर पुरस्कार होता. त्या सामन्यात त्याने ३३ चेंडूंचा सामना करत ७३ धावा केल्या. यासह एबीने किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेलचा विक्रमही मोडला आहे.
डिव्हिलियर्सने सामनावीर पुरस्कारांच्या बाबतीत गेलला मागे टाकले आहे. यासोबतच, एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहलीच्या जोडीने दहाव्यांदा १०० धावांची भागीदारी केली. असा विक्रम करणारी ती पहिली जोडी ठरली आहे. विराट आणि डिव्हिलियर्सने ४६ चेंडूत १०० धावांची भागीदारी केली.
सोमवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाइट रायडर्सचा ८२ धावांनी पराभव केला. या विजयासह बंगळुरूने गुणतालिकेत तिसरे स्थान काबीज केले. एबी डिव्हिलियर्सने, या सामन्यात कोलकाताच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याने नाबाद ७३ धावांच्या खेळीत ६ षटकार आणि ५ चौकार ठोकले. बंगळुरूच्या विजयानंतर विराट कोहलीने एबी डिव्हिलिअर्सचे कौतूक 'जिनिअस' खेळाडू असे केले आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवणारे खेळाडू -
- एबी डिव्हिलियर्स - २२
- ख्रिस गेल - २१
- रोहित शर्मा - १८
- डेव्हिड वॉर्नर - १७
- एम. एस. धोनी - १७
- शेन वॉटसन - १६