नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आकाश चोप्राने शाहिद आफ्रिदीला ट्रोल केले आहे. आफ्रिदीने नुकतेच भारतीय संघाबाबत भाष्य केले होते. ''पाकिस्तान संघ भारताला इतक्या वेळा हरवायचा, त्यानंतर भारतीय खेळाडू आमच्याकडे येऊन माफी मागायचे'', असे आफ्रिदीने म्हटले होते. आफ्रिदीच्या या वक्तव्यावर आकाश चोप्राने आपले उत्तर दिले आहे.
आकाशने आफ्रिदीचे सर्व दावे आकडेवारीतून उघड केले आहेत. आकाशने आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले, ''पाकिस्तानचा संघ एकेकाळी मजबूत असायचा. पण, आता तो बरा आहे. हो. एक काळ असा होता की जेव्हा भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध शारजाहमध्ये खेळायचा, तेव्हा पाकिस्तानचे पारडे जड असायचे. पण हा काळ आफ्रिदीच्या वेळेचा नव्हता.''
आकाश पुढे म्हणाला, ''पाकिस्तानची शक्ती ही त्यांची नैसर्गिक प्रतिभा होती. इम्रान खान, वसीम वक्रम, वकार युनूस हे खेळाडू संघात होते. त्यांच्या मदतीने पाकिस्तानचा संघ भारताला हरवायचा. पण नंतर जेव्हा आफ्रिदी खेळू लागला आणि जेव्हा त्याने निवृत्ती घेतली तेव्हा चित्र खूप बदलले होते. जर तुम्ही आकडेवारी पाहिली तर आम्ही 15 कसोटी सामने खेळले आणि दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच जिंकले. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानने भारतापेक्षा दोन अधिक सामने जिंकले. 82 पैकी ही आकडेवारी 41-39 अशी आहे. पण या दोन सामन्यासाठी कोणी माफी मागायला जाईल, असे मला वाटत नाही.''
तो पुढे म्हणाला, ''पण आता टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची आकडेवारी पाहिली, तर भारतीय संघाने पाकिस्तानवर चांगली आघाडी मिळवली आहे. भारत 7-1 ने आघाडीवर आहे. ही गोष्ट पूर्ण उलट नाही का? आफ्रिदीला काहीतरी वेगळे म्हणायचे होते पण तो काहीतरी वेगळेच बोलून गेला. मी आश्चर्यचकित झालो आहे. आफ्रिदीच्या काळात दोन्ही संघांमध्ये समतोल होता. पण पारडे भारताकडे झुकू लागले. जर सध्याच्या टप्प्याबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघ खूपच मजबूत आहे. लोकं म्हणतात की सापाच्या चावण्यावर उपचार आहे पण गैरसमज असण्यावर कोणताही उपचार नाही.''
''वर्ल्ड कपचा विचार केला तर भारत आघाडीवर आहे. आपण नेहमीच 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याबद्दल बोलता, परंतु या स्पर्धेत भारताने एकदा पाकिस्तानला पराभूत केले होते. जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला जातो तेव्हा तो तेथे जिंकतो. ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यावर पाकिस्तानला दारूण पराभव स्विकारावा लागतो. याक्षणी दोन्ही संघात बरेच अंतर आहे.''