नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर आपला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. १९८३च्या विश्वविजेत्या संघातील खेळाडूंचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. त्यावर कपिल देव यांनी व्हिडिओ पोस्ट करत आपली प्रकृती सुधारत असल्याचे म्हटले आहे. मी माझ्या सर्व जुन्या मित्रांना भेटण्यासाठी उत्सुक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
जांभळ्या रंगाचा टी-शर्ट आणि ट्राऊझर घालून काढलेल्या या व्हिडिओत कपिल म्हणाले आहेत, "माझे ८३चे कुटुंब. वातावरण अल्हाददायक झाले आहे आणि मी तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी उत्सुक झालो आहे. माझी प्रकृती झपाट्याने सुधारत आहे. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांमुळेच मी लवकर ठिक होत आहे. ८३ चित्रपट कधी प्रदर्शित होईल माहित नाही मात्र, त्या अगोदरच मी तुम्हा सर्वांना भेटण्याचा प्रयत्न करेल. आता आपण या वर्षाच्या शेवटाला आलो आहोत आणि मला विश्वास आहे की, येणारे वर्ष आपल्या सर्वांसाठी नक्कीच चांगले असेल."
गेल्या आठवड्यात झाली होती शस्त्रक्रिया -
कपिल देव यांनी शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) छातीत दुखत होते. त्यानंतर त्यांना दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. या वृत्तानंतर क्रीडाजगत आणि इतर क्षेत्रातील अनेकांनी आपल्या लाडक्या कर्णधाराच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली होती. अँजिओप्लास्टीनंतर रविवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कपिल देव यांची क्रिकेट कारकीर्द -
कपिल देव यांच्या नेतृत्वात १९८३मध्ये भारताने प्रथमच विश्वकरंडक जिंकला. कपिल देव यांनी भारताकडून १३१ कसोटी आणि २२५ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी अनुक्रमे ५ हजार २४८ आणि ३ हजार ७८३ धावा केल्या आहेत. याशिवाय त्यांनी २७५ प्रथम श्रेणी सामने आणि ३१० लिस्ट-ए सामने खेळले आहेत.